आष्टी(बीड) -वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत काळ्या आईची सेवा करणाऱ्या पाटोदा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं कांद्याचे विक्रमी उत्पादन घेत एक आदर्श उभा केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत योग्य नियोजन केल्यानं कांद्याचे जोमदार पिक त्यांनी घेतले आहे. सात एकरात किमान सव्वाशे टन उत्पादन होण्याची खात्री असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
शेतीला आधुनिकतेची जोड
बीड जिल्ह्याच्या पाटोदा शहरानजिक कीर्तनकार ह.भ.प. रामकृष्ण रंधवे महाराज यांची शेती आहे. वारकरी संप्रदायाची सेवा करतानाच काळ्या मातीशी असलेली नाळही त्यांनी जोपासली आहे. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर ते शेतीत करतात. यंदा त्यांनी सात एकरावर कांद्याची लागवड केली. सुरूवातीपासून योग्य नियोजन केल्याने त्यांचे पिक जोमदार आले आहे. सध्या शेतातील कांदा परीपक्व झाला असून एका कांद्याचे वजन 250 ग्रॅमच्या वर आहे. त्यामुळे सात एकरात किमान 100 ते 125 टन उत्पादन होण्याची खात्री रंधवे महाराजांनी व्यक्त केली आहे. यातून किमान 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न हाती पडेल अशी त्यांची अपेक्षा आहे.
प्रत्येक कांद्याचे वजन पाव किलो
मार्च 2020 पासून कोरोना विषाणूच्या थैमानामुळे सर्वत्र लोकडाऊन जाहीर करण्यात आले होते त्यामुळे सर्वत्र बंद अशी परिस्थिती असल्यामुळे रंधवे बापु यांनी राज्यभरातील कीर्तनसेवा थांबून आपले पूर्ण श्रम शेतीमध्ये वापरले. आधुनिक तंत्र आणि यंत्रांचा वापर करून त्यांनी या उत्पादनवाढीस योगदान दिले. यातून 250 ग्रॕम वजनाचा कांदा पोसला गेला. चक्क आपल्या शेतगड्यबरोबर दारे धरुन,शेतात राबुन त्यांनी ही किमया घडवुन आणली.
वीस ते पंचवीस लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा
" स्वतः व शेतगडी तसेच कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत प्रचंड कष्ट केले. रात्रंदिवस शेतात राबून विविध यंत्र-तंत्र आणि औषध व फवारणी चा वापर केला..यातून हे प्रचंड उत्पादन घेतले. अडीच हेक्टर मध्ये 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी साधारण अपेक्षा आहे". -रामकृष्ण रंधवे, शेतीनिष्ठ शेतकरी
हेही वाचा -चांदूर रेल्वे : महिलेने परसबागेत फुलविली सेंद्रिय ब्रोकोली