बीड- राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक हे अत्यंत तुटपुंजा मानधनात काम करत आहेत. आता शासनाने मानधन वाढवून द्यावे, या मागणीसाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आवाज उठवणार आहेत. 11 ते 13 मे दरम्यान काळ्या फिती लावून हे सर्व कामगार काम करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांनी सांगितले.
वाढीव मानधनासाठी आशा वर्कर्सचे आंदोलन, काळ्या फिती लावून करणार काम - आशा वर्करचे मानधन
राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक हे अत्यंत तुटपुंजा मानधनात काम करत आहेत. आता शासनाने मानधन वाढवून द्यावे, या मागणीसाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आवाज उठवणार आहेत. 11 ते 13 मे दरम्यान काळ्या फिती लावून हे सर्व कामगार काम करणार आहेत.
या आंदोलनाबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. वारंवार शासनाकडे मागणी करूनदेखील आशा वर्करला तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या संकटात बीड जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर आशा वर्कर यांनी आरोग्य विभागाच्या बरोबरीने काम केलेले आहे. तरीही केवळ 50 ते 60 रुपये रोजाने आशा वर्कर यांना काम करावे लागते. ही बाब वारंवार जिल्हा प्रशासनाच्या व शासनाच्या लक्षात आणून दिली. तरीदेखील वाढीव वेतन मिळत नसल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे. अशा परिस्थितीत काम बंद ठेवून आंदोलन करणे योग्य नाही. यामुळे, आम्ही काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासोबतच शासनाने आशा वर्करच्या मानधनात वाढ करावी. शिवाय त्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.