बीड -ऊस तोडणीसाठी घेतलेली उचल परत देऊ शकत नसलेल्या एका ऊसतोड कामगाराचे अपहरण केल्याची घटना गेवराई तालुक्यात दोन दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. तसेच, अपहरण झालेल्या मजुराची सुटका करून संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.
याप्रकरणी अपहरण झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेवराई तालुक्यातील एका पेट्रोल पंपावरून दिगंबर माने नावाच्या एका व्यक्तीने जीपमधून 10 ते 12 जणांसह येऊन ऊसतोड मजूर रामा बोर्डे याला मारहाण करत शिवीगाळ केली व त्याला उचलून नेले. याबाबत आरोपीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी अपहरण झालेल्या मजुराच्या नातेवाईकांनी केली आहे. अशा घटना वाढल्या असून तत्काळ कारवाई केली नाही तर आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पवार यांनी दिला आहे.