आष्टी (बीड) - मातावळी परिसरातील डोंगरातील झाडीत वयोवृद्ध बिबट्याचा कुजलेला मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (18 जून) गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा जबडा, हाडे आणि कातडी दिसली. याची माहिती आष्टी वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. तो बिबट्या महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याचे, तसेच तो वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा; असा दावा वनविभाग अधिकारी शाम शिरसाठ यांनी केला आहे.
अहवालातून स्पष्ट होणार मृत्यूचे कारण
घटनास्थळी वनविभागाने धाव घेतली. वरिष्ठ पशुवैद्यकीय डॉक्टर व टीमला पाचारण केले आहे. बिबट्याचा मृत्यू कशाने झाला असेल, ते वैद्यकीय अहवालातच समोर येईल, अशी माहिती आष्टी तालुका वनविभाग अधिकारी शाम शिरसाठ यांनी दिली आहे.