महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी एकाची जलसमाधी - मातंग

मातंग समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे ही मागणी अनेक वर्षापासून समाज करत आहे. या मागणीसाठी बीडमधील तरुणाने जलसमाधी घेतली आहे.

मृत संजय ताकतोडे

By

Published : Mar 5, 2019, 4:47 PM IST

बीड- मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, अशी मागणी करत एका ३५ वर्षीय तरुणाने मंगळवारी सकाळी बिंदुसरा प्रकल्पात जलसमाधी घेतली आहे. जलसमाधी घेण्यापूर्वी त्या तरुणाने आपला व्हिडिओ व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. संजय ताकतोडे (रा. काळेगाव , केज) असे या व्यक्तीचे नाव आहे.

संजय ताकतोडे व्हीडिओ


मंगळवारी सकाळी व्यायामाला गेल्यानंतर संजय ताकतोडे याने बिंदुसरा प्रकल्पात उडी मारून जीव दिला. त्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट व व्हिडिओ वायरल केली. त्यामध्ये तो म्हणतो की, मागील अनेक वर्षापासून स्वतंत्र आरक्षण मागणीसाठी मातंग समाज मोर्चा काढत आहे. अनेक वेळा अर्धनग्न मोर्चा काढला तरीदेखील हे सरकार मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देत नाही. मातंग समाजाच्या मुलींवर अन्याय अत्याचार केला जातो. लोकसंख्येप्रमाणे मातंग समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी संजय ताकतोडे यांनी व्हिडिओद्वारे केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातील मातंग समाजात वातावरण तापले असून मातंग समाज आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मी माझ्या समाजासाठी जीव देत आहे, आता तरी या सरकारने आमच्या मातंग समाजाला न्याय द्यावा, असे म्हणत बिंदुसरा प्रकल्पात उडी मारून जलसमाधी घेतली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे.

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा नोंदवा, मृताच्या भावाची मागणी

जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी परिसरात मोठी गर्दी केली. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृताचा भाऊ हनुमंत ताकतोडे याने घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details