बीड - महिलेच्या गर्भातील बाळाचे लिंग उघड केल्याप्रकरणी बीडमधील डॉ. राजेंद्र ढाकणेला गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार बीडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. तसेच या संदर्भात मेडिकल कौन्सिलला कळवण्याचे निर्देश बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत.
बीड जिल्ह्यात २०१०-१२ या कालावधीत गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्या होत्या. जिल्ह्याचा स्त्री जन्मदरही कमालीचा घटला होता, त्यावेळी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या प्रकाराविरुद्ध आघाडी उघडली होती.
त्यातच ऑक्टोबर २०११ मध्ये दिल्लीच्या समितीने डॉ. राजेंद्र ढाकणे याच्या सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी केली. यात, अनियमितता आढळून आल्याने समितीने जिल्हा शल्य चिकित्सकांना सविस्तर तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली. त्यावेळी त्याठिकाणी सोनोग्राफी केलेल्या महिलांची माहिती विहित नमुन्यात ठेवली नसल्याचे समोर आले. तसेच एका महिलेच्या नावासमोर सांकेतिक शब्दात गर्भलिंग निदानाचा उल्लेख आढळला होता. त्यानुसार डॉ. राजेंद्र ढाकणेविरुद्ध बीडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर गुन्हा दाखल करण्यात आला होता.