बीड- जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. रविवारी पाठवलेल्या 29 नमुन्यांपैकी 7 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 झाला आहे.
सापडलेले रुग्ण नगरवरून आले होते. आष्टी तालुक्यात रविवारी आढळून आलेले सातही रुग्ण हे मूळचे नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील मूळ रहिवासी आहेत. मात्र, आष्टी तालुक्यातील सांगवी येथे सून असल्याने व बीड जिल्हा कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित असल्यामुळे सांगवी येथे वास्तव्यासाठी ते आले होते. 13 मे रोजी त्यांनी बीड जिल्ह्यात प्रवेश केला होता. येताना पोलिसांना चुकीची माहिती दाखवून बीड जिल्ह्यात प्रवेश केला.
सांगवी पठाण हे गाव त्यांच्या सुनेचे गाव असून बीड जिल्हा सुरक्षेत असल्यामुळे त्यांनी या गावी येण्यासाठी पास मिळवला. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर ते शेत वस्तीवर क्वारंटाईन होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागताच स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. रविवारी पाठवण्यात आलेले एकूण 29 अहवाल यापैकी 22 अहवाल निगेटिव्ह आले. मात्र सात अहवाल येण्यास उशीर झाला. त्यावेळीच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली होती. अखेर ही शंका खरी ठरली. आष्टीत यापूर्वी एक कोरोना रुग्ण सापडला होता. मात्र, त्याच्यावर नगर येथे उपचार करण्यात आले होते. पुन्हा एकदा सात रुग्णांची भर पडल्यामुळे बीडची एकूण रुग्ण संख्या नऊ झाली आहे.
नवी मुंबई येथे हे रुग्ण नोकरीला होते. रविवारी सापडलेला सातही पॉझिटिव्ह रुग्ण रेड झोनमधून आलेले आहेत. या सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता बीड जिल्हा प्रशासन हादरले असून आता बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विशेष म्हणजे रविवारी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या नमुन्याचा समावेश नव्हता. हे सर्व नमुने बीडच्या जिल्हा रुग्णालयातून पाठवले होते. या सात रुग्णासह बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 9 वर पोहोचली असून बीड येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.