बीड -जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. यानंतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांचे आकडे कमी होत असले तरी अद्याप संकट टळलेले नाही, असे आरोग्य विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यात तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांना बाधा झाली तर पूर्वतयारी म्हणून जिल्हा आरोग्य विभागाकडून 600 खाटांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ञ सचिन आंधळकर यांनी दिली.
बीड जिल्ह्यात दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. आतापर्यंत 2095 एवढ्या रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांचा संसर्ग आटोक्यात आला आहे. प्रत्येक दिवशी 100 ते 150 या दरम्यान पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. दुर्दैवाने तिसरी लाट आली तर त्याचा फटका लहान मुलांना बसू नये, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात 600 खाटांची (लहान मुलांसाठी) तयारी करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयात 50 आयसीयु बेड तयार केले आहे, अशी माहिती डॉ. आंधळकर यांनी दिली.