बीड- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील विधी शाखेच्या परीक्षा मार्च-एप्रिल २०१९ या कालावधीत घेतल्या होत्या. मात्र, परीक्षा होऊन तब्बल ५५ दिवस पूर्ण झाले तरी विद्यापीठाने या परीक्षांचे निकाल अद्यापही जाहीर केलेले नाहीत. तसेच कागद नसल्यामुळे निकालास उशीर होत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर आणि विद्यार्थी संघटनेच्या विशाखा जाधव यांनी उपस्थित करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
कागद नाही म्हणून विधी परीक्षेचा निकाल लांबणीवर; मराठवाडा विद्यापीठाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन - संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर व विद्यार्थी संघटनेच्या विशाखा जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निकालाला विलंब झाला तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.
२५ एप्रिल ते ६ मे या कालावधीत विद्यापीठाने विधी शाखेच्या पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या होत्या. परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत निकाल जाहीर करणे विद्यापीठावर बंधनकारक आहे. ६ मे ते २१ जून या तारखेपर्यंत विद्यापीठाने निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप विद्यापीठाने निकाल जाहीर केला नाही. त्यामुळे आंदोलकांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निकालाला विलंब झाला तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ कागद उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत आहे. आम्हा विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे. तसेच १५ जुलै २०१९ पर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, असे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जर निकालाला विलंब झाला तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा विद्यार्थी संघटनेच्या विशाखा जाधव यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी दिला आहे.