बीड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणीक नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यातच कोरोनाशी झुंज देताना अनेकांचा मृत्यूही होत आहे. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील महार टाकळी येथील एका व्यक्तीचा कोरोना वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्यांतर त्याचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमध्ये आदिवासी शिक्षितांपेक्षाही समजूतदार..
मागील चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील महार टाकळी येथील एका चाळीस वर्षीय व्यक्तीला सर्दी, खोकला व ताप येत असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. संबंधित व्यक्तीची कोरोना तपासणी केली असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असतानाही संबंधित व्यक्तीचा मृत्यू का झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बाबत बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीची स्वाईन फ्लू व सारी या विषाणूची देखील तपासणी करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट आज सायंकाळपर्यंत येईल. तो रिपोर्ट आल्यानंतरच कळेल की संबंधित व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला.
बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवर महारटाकळी हे गाव आहे. येथील रहिवासी असलेला 40 वर्षीय व्यक्तीला सर्दी खोकला ताप याचे लक्षण आढळून आले. त्यांना गेवराई येथील दवाखान्यात दाखवले असता, संबंधित व्यक्तीला कोरोची लक्षने असल्याच्या संशयावरुन बीड जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीची कोरोना तपासणी केली असता, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोन दिवसाने म्हणजेच मंगळवारी पहाटे एक वाजता त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असताना देखील संबंधित व्यक्तीचा मृत्यू का झाला याचा तपास आरोग्य विभाग करत असून स्वाईन फ्लू तसेच सारी या नव्या विषाणूंची देखील त्या व्यकीची तपासणी केली आहे. त्याचे अहवाल येणे बाकी आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.