बीड- दुबईहून महाराष्ट्रात आलेल्या काही नागरिकांपैकी पुण्यामधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पुण्याच्या दोघांबरोबर बीड येथील एकाच कुटुंबातील तिघे त्या विमानात होते. या तिघांच्या तपासणीनंतर सुदैवाने त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
बीड जिल्ह्यातील या तीन व्यक्तींबाबत राज्य सरकारने तत्काळ जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवले होते. याद्वारे त्या कुटुंबातील व्यक्तींची नावे पाठवून त्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, तातडीने पावले उचलल्यानंतर या तिघांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, यानंतरही सावधगिरी म्हणून या तिघांवर पुढील २८ दिवस करडी नजर ठेवण्यात येणार आहे.