बीड -येथील पाटबंधारे कार्यालयाच्या प्रांगणात जाळून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर, अखेर तीन अधिकाऱ्यांवर नातेवाईकांच्या फिर्यादीवरून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागाकडे संपादित जमिनीच्या एकत्रीकरणासाठी वारंवार प्रस्ताव देऊन देखील न्याय मिळत नसल्याने, मंगळवारी दुपारी बीड तालुक्यातील पाली येथील शेतकरी अर्जुन कुंडलिकराव साळुंके या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. अर्जुन साळुंके यांनी पाटबंधारे विभागाच्या परिसरात अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. या घटनेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्जुन साळुंके यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला. जोपर्यंत सबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर अखेर याप्रकरणी पाटबंधारे खात्याचे अभियंता, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.