बीड - २५ एकर क्षेत्राच्या गैरव्यवहाराचे प्रकरण २१ फेब्रुवारी रोजी येथे उघडकीस आले. शहरालगतची ही जमीन भू माफियांना कवडीमोल दरात विक्री करुन कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळकेसह आठ जणांवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यापूर्वी पाच गुन्हे नोंद आहेत. त्यात आता आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. ( Waqf Board Land Scam Beed ) जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुम्मा सय्यद यांनी याबाबत तक्रार दिली. ( Beed Warf Board Officer Ameenjumma Saiyyad )
शेळके यापूर्वीच्याही वक्फ बोर्डच्या गुन्ह्यांत आरोपी -
शहरातील पांगरी रोडवरील सारंगपुरा मस्जिद संबंधित वक्फ बोर्डच्या मालकीची सर्वे क्र. १२८ मध्ये २५ एकर ३८ गुंठे जमीन आहे. ही जमीन रोशन अली मुनवर अली यांनी दिनकर गिराम यांना १९८७ मध्ये ९९ वर्षांसाठी करारावर दिली. त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन २०१८ मध्ये जमीन बेकायदेशीररीत्या खासगी लोकांच्या नावे केली. याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी डॉ.एन.आर.शेळके, मंडळाधिकारी पी.के. राख, तलाठी या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अशोक पंडितराव पिंगळे, श्रीमंत बापू मस्के, सखाराम बाबूराव मस्के, सर्जेराव पांडुरंग हाडुळ, उध्दव तुळशीराम डपाटे यांच्यावर फसवणूक, अपहार व वक्फ अधिनियम ५२ (ए)नुसार गुन्हा नोंद झाला. पो.नि. संतोष साबळे तपास करत आहेत. दरम्यान, डॉ. एन. आर. शेळके यापूर्वीच्याही वक्फ बोर्डच्या गुन्ह्यांत आरोपी आहे. त्याच्या वादग्रस्त कारनाम्यांमुळे त्यास सेवेतून बडतर्फ केलेले आहे.