बीड- आयुष्यात मी चांगला व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो’ असे भिंतीवर लिहून बारावीच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवल्याची घटना, जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी योगेश्वरी नगरी भागात घडली असून सदरील विद्यार्थी हा तणावात असल्याचे समोर आले आहे. सतत अयशस्वी होत असल्याने त्याने आत्महत्येचा पाऊल उचलल्याचे समजते आहे.
गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरुप्रसाद आपल्या कुटुंबासह योगेश्वरी नगरी येथील ‘शरयू’ इमारतीतील फ्लॅटमध्ये राहत होता. तो योगेश्वरी महाविद्यालयात बारावीला शिकायचा. त्याचे वडील शिक्षक आहेत तर त्याच्या दोन बहिणींचे लग्न झालेले आहे. मागील काही दिवसापासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालय आणि शिकवणीला जाऊन घरी परतला. तब्येत ठिक नसल्याने दुपारच्या सुमारास गुरुप्रसादची आई रुग्णालयात गेली होती तर वडील शाळेत होते. दुपारी ४ नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.