बीड- शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे १२ लाख शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे. उन्हाळी मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असून पात्र विमा धारक शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
या बाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी संचालक, ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांच्यासह आदींकडे याबाबत लेखी मागणी केली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ वाटप करण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे.
खरीप २०१८ च्या हंगामाकरीता बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम भरणा केलेली आहे. सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकांचा विमा बँकेकडे वर्ग झालेला आहे. मात्र, शासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.
बीड जिल्ह्यात सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी विमा हप्ता भरला होता. या पात्र विमा धारक शेतकऱ्यांना सुमारे ८०० ते ९०० कोटी रुपये पीक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.
पेरणीपूर्वी उन्हाळी मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही, शेतकऱ्यांना सध्या पैशांची नितांत आवश्यकता आहे. शासनाने केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत किमान ज्या शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. पुढील सात दिवसांत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा, अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला आहे.