बीड -आष्टी तालुक्यातील तवलवाडी गावामध्ये मागील चार ते पाच दिवसांमध्ये 60 संकरित गाई आणि 40 वासरांचा घटसर्प आजाराने मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाय व वासरे मृत्यूमुखी पडल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांचे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान मृत गाईंचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार घटसर्प आजाराने या जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख, डॉ. संतोष शामदीरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी तवलवाडी गावाला भेट देऊन, संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचे सात्वन केले.
घटसर्प आजाराची लक्षणे
या आजारामध्ये सुरुवातीला गाईला तीन दिवस लाळ्या खुरकुर आजारा प्रमाणेच ताप येतो, ताप आल्यानंतर चौथ्या, पाचव्या दिवशी श्वासनाचा त्रास होऊन जनावर दगावते.
गावावर शोककळा
आष्टी तालुक्यातील तवलवाडी हे गाव दूध उत्पादनात अग्रेसर गाव आहे. गाव जरी लहान असले तरीही या ठिकाणी जवळपास पाच हजार लिटर दैनंदिन दूध संकलन केले जाते. या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय निवडला आहे. मात्र घटसर्प आजारामुळे 100 जनावरे दगावल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी तात्काळ तवलवाडीला भेट देऊन घटनेची माहिती घेतली, तसेच ग्रामस्थांना धीर दिला. त्यांनी याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गावाला भेटी
या घटनेने पशुवैद्यकीय विभागामध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी तवलवाडी गावामध्ये औरंगाबाद येथील विभागीय पशु रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत चौधरी, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रोहित धुमाळ, डॉक्टर वानखेडे यांच्या टीमने भेट दिली असून पाहणी केली आहे. तसेच आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मंगेश ढेरे यांची टीम दोन दिवसांपासून तवलवाडी गावामध्येच तळ ठोकून आहेत.
हेही वाचा -हम दिल दे चुके सनम, नाही हे भलतंच...!!! पतीनं बायकोचं लग्न लावून दिलं प्रियकराशी