बीड - गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे दुचाकी, स्कार्पिओ आणि कार यामध्ये तिहेरी अपघात झाला. त्यानंतर अपघातग्रस्त कारने अचानक पेट घेतला. या आगीत एक महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर घडली.
गेवराईत 'तिहेरी' अपघात : कारने पेट घेतल्याने महिलेचा होरपळून मृत्यू, २ गंभीर
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे दुचाकी, स्कार्पिओ आणि कार यामध्ये तिहेरी अपघात झाला. त्यानंतर अपघातग्रस्त कारने अचानक पेट घेतला. या आगीत एक महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, ज्ञानेश्वर जाधव हे आपल्या कुटुंबियांसह कार (एम एच-14 एमएच - 8639) मधून पुण्याहून परभणीकडे निघाले होते. तेव्हा स्कार्पिओ (एम एच 16-बीडी - 2151) परभणी कडून पुण्याकडे निघाली होती. गेवराई तालुक्यातील कोळगाव शिवारात कारला अचानक एक दुचाकी (एमएच 23 एडी - 4596) आडवी आली. त्या दुचाकीला चुकवताना स्कार्पिओ आणि कार यांच्यात धडक झाली. यामध्ये कारने पेट घेतला. काही कळायच्या आतच काऱ आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
कारमध्ये बसलेल्या मनीषा जाधव व त्यांची मुलगी लावण्या यांना बाहेर येता आले नाही. लावण्याचे वडील ज्ञानेश्वर जाधव हे कारमधून बाहेर निघेपर्यंत 60 टक्के भाजले. आग इतकी भयंकर होती की लावण्या व तिची आई मनीषा यांना बाहेर काढणे शक्य झाले नसल्याचे ज्ञानेश्वर जाधव सांगतात. त्यांच्यावर व त्यांची मुलगी लावण्या हिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.