औरंगाबाद- शेंद्रा भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली. प्राची गणेश एखंडे (३२, रा. प्रसन्न पार्क, शेंद्रा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
औरंगाबादच्या शेंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेची आत्महत्या - गळफास
पती गणेशने झोपेतून उठल्यानंतर प्राची कुठे दिसत नाही म्हणून तिचा शोध घेतला. दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतुन बंद असल्याचे दिसुन आल्या नंतर दरवाजा तोडला तेव्हा प्राची यांनी गळफास घेतलेला होता.
प्राची या पती गणेश व इतर कुटुंबासह शेंद्रा परिसरात राहत होत्या. त्या एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या व त्यांचे पती गणेश हे एका खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षक आहेत. शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्य पहिल्या मजल्यावर झोपले होते. त्यानंतर प्राची यांनी दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन गळफास घेतला. शनिवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर गणेश यांनी पत्नी प्राची दिसून न आल्याने तिचा शोध सुरू केला. वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसुन आल्यानंतर दरवाजा तोडला तेव्हा हा प्रकार समोर आला.
त्यानंर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही पूर्ण केली. प्राची यांना औरंगाबाद शहरामध्ये स्थायिक होण्याची इच्छा होती. मागील काही दिवसांपासून त्या कुटुंबाकडे यासाठी मागणी करत होत्या. प्राची यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नसून नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांनी आत्महत्या केली, याचा तपास चिकलठाणा पोलीस अधिकारी आबासाहेब देशमुख आणि दिनकर थोरे हे करत आहेत.