विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे घातलं साकडं छत्रपती संभाजीनगर ZP Students Letter to CM: सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, पत्रास कारण की...... अशी सुरुवात करणारं पत्र जवळपास इतिहास जमा झालं आहे. मात्र अशाच पत्रांचा आधार घेत जिल्हापरिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून जिल्हा परिषद शाळा वाचवण्याचं साकडं घातलं आहे. त्यामुळं यानिमित्तानं पुन्हा एकदा लुप्त होत असलेल्या पत्रव्यवहारही चर्चा सुरू झाली आहे.
सरकारच्या निर्णयानं होणार नुकसान : राज्याच्या शिक्षण विभागानं जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यांनी व्यथित होत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून गरीब मुलांच्या शिक्षणाची कैफियत मांडली. ज्या शाळा बंद होणार आहेत तेथील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी शाळेत जाणं शक्य नसल्याचं आपल्या पत्रात नमूद केल्यानं या पत्रानंतर तरी शिक्षण विभागाला पाझर फुटणार का? असा प्रश्न निर्माण झाल्यानं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांना साकडं :आज फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सॲप आणि डिजीटल माध्यमातून क्षणार्धात आपलं म्हणणं अगदी सहज आणि जलद गतीनं जगासमोर मांडता येतं. मात्र पोस्टमन काकांच्या पाठीमागं फिरुन आपल्या मामाचं पत्र मिळविण्यात, आपल्या आत्याची खुशाली ऐकण्यात जो आनंद होतो, तो आनंदही नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पत्र पाठवण्याचा आनंद मिळावा आणि आपली व्यथा देखील मांडता यावी म्हणून शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषेत आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्यक्ष पोस्टकार्डवरच पत्रलेखन करून जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी आसेगावच्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरीच्या चिमुरड्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच साकडं घालत प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे.
असं आहे विद्यार्थ्याचं पत्र : जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब घरातील मुलं शिक्षण घेतात. मात्र नवीन नियमामुळं अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनी आपल्या पत्रात मांडल्या आहेत. प्रत्येकाची व्यथा वेगळी असते आणि ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी याकरिता विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं पत्र लिहून आपली व्यथा त्यात मांडली आहे. त्यातील एक पत्र असे की,
'मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य,
पत्र लिहिल्यास कारण की, साहेब आपण कमी पोरं असणाऱ्या शाळा बंद करणार आहेत. जर या शाळा बंद झाल्या तर माझ्यासारख्याच त्या शाळांतल्या मुलांच्या शिकण्याचं काय होईल ? म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की, या शाळा बंद करू नका. जर या शाळा बंद झाल्याच तर तिथल्या पोरांना दुसऱ्या गावाला शिकायला जावं लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यातील छातीपर्यंतच्या पाण्यातून कसं जायचं ? म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की, या शाळा बंद करू नका.
आपला - संकेत शेळके
पत्र जिवंत ठेवण्याचा प्रयत्न : काळाच्या ओघात पत्रे इतिहासजमा होत असताना पत्र, पोस्टकार्डचं महत्व, पत्राचा मायना, पत्रलेखन याची माहिती प्रत्यक्ष कृती लेखनाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना अतिशय गरजेची आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा या हेतूनं पोस्टकार्ड लेखनाचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजमाध्यमांच्या जगात सुद्धा विद्यार्थ्यांनी पत्र लेखन अतिशय उत्तमपणे सादर करत आपल्या भावनांना यानिमित्त वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. पत्रलेखनामुळं विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण होते.आपल्यातील संवेदनशीलता जोपासण्यासाठी पत्रलेखन हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याचा वापर करून पत्र लेखन सोबत येणाऱ्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आसेगाव जिल्हा परिषद वर्ग शिक्षिका गितांजली साळुंके-हिवाळे यांनी दिली.
हेही वाचा :
- Devendra Fadnavis on Toll Plaza: टोलनाक्यावरुन फडणवीस यांची तब्बल आठ वर्षापूर्वीची माहिती देऊन सारवासारव; तर राज ठाकरे पुन्हा आक्रमक
- Vijay wadettiwar: राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत...विजय वडेट्टीवार यांचा घरचा आहेर
- MNS Toll Protest : 'टोल'वरुन मनसे आक्रमक; कार्यकर्ते असेपर्यंत गाड्या सोडल्या फुकट अन् नंतर आकारले