औरंगाबाद -हॉटेलमध्ये चहा पित बसलेल्या तरुण ठेकेदाराच्या डोक्यात धारदार किऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. शहरातील उस्मानपुरा भागातील शहानूरमिया दर्गा परिसरात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. शेख सुभान शेख अमिर (वय 37) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो उस्मानपुरा येथील शम्सनगरमधील रहिवासी आहे.
सुभान बुधवारी रात्री उस्मानपुरा भागातील शहानुरमिया दर्गा जवळील रमजानी हॉटेल येथे मित्रांसह चहा पित गप्पा मारत बसला होता. त्याच दरम्यान तेथे शेख नईम शेख सलीम उर्फ गोरू, शेख अलीम शेख सलीम उर्फ बच्चू, शेख समीर शेख सलीम हे तिघे भाऊ हॉटेलमध्ये आले. काही समजण्याच्या आतच गोरूने स्वतः सोबत आणलेल्या धारधार कुऱ्हाडीने पाठीमागून सुभानच्या डोक्यात वार केले. कुऱ्हाडीच्या घातक प्रहाराने रक्तबंबाळ होऊन सुभान जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला होता. नागरिकांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक धनके करीत आहेत.