पाचोड (औरंगाबाद) -परराज्यातून मोसंबी तोडण्यासाठी आलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाचोडमध्ये घडली आहे. त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शुकलू भरती असं या तरुणाचे नाव आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मोसंबी तोडण्यासाठी परराज्यातून आलेल्या तरुणाची पाचोडमध्ये आत्महत्या
पैठण तालुक्यातल्या पाचोडमध्ये मोसंबी तोडण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या मजुराने आत्महत्या केल्याची घटना घडलीये. शुकलू भरती असं या तरुणाचे नाव आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालं नसून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील पाचोडमध्ये मोसंबी मार्केट आहे. या ठिकाणी मोसंबी तोडण्यासाठी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यातून मजूर येत असतात. शुकलू भरती हा तरुण मोसंबी तोडण्यासाठी मध्यप्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातून पाचोडला आला होता. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे इतर कामगारांसोबत दादेगावला मोसंबी तोडण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबतचे कामगार मोसंबी तोडायचं काम करत असतांना त्याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. घटनेचा अधिक तपास पो.कॉ. जगनाथ उबाळे व हणुमान धनवे करत आहेत.