औरंगाबाद - शहरातील विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने वर्षभरात घडलेल्या घटनांचा सोमवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पाढा वाचला. वर्षभरात चोरांनी शहरात कहर केला, घरफोड्या, तोतया पोलीस, वाहनचोरी, मोबाईल चोरी तसेच अन्य किरकोळ चोर्यांमुळे पोलीस हैरान झाले आहेत. तरीदेखील पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईवर आयुक्त प्रसाद यांनी समाधान व्यक्त केले. पोलीस ठाण्यांची कारवाई यंदा सरस राहिली. बंदोबस्त पार पाडत पोलीस ठाण्यांच्या प्रभारी गुन्ह्यांची उकल केल्याने त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आयुक्तांनी तोंडभरून कौतुक केले.
शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ९ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. वाळूजमधील मृत कमलेश पाणी आणि बेगमपूर येथील मृत शफीक खान यांच्या गुन्ह्यांमध्ये कुठलाही धागादोरा नसताना दोन्ही गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. वाळूज पोलिसांनी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणले आहे. तर, पुंडलिक नगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत ५ गावठी पिस्टल ४८ किलो गांजा, बनावट नोटांचे स्कँडल उघडकीस आणले. तसेच ऑनलाईन पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये संशयित महिलेला अटक करून तब्बल ३२ लाख रुपये सायबर क्राईम शाखेने कॅनरा बँकेला परत मिळवून दिले. तर, ७९ लाख रुपये असलेले खाते गोठविण्यात आले.
ऑनलाईन फसवणुकीच्या आणखी एका प्रकरणात संशयित आरोपी धनेश्वर पोतदार व पिंकू यादव यांना अटक करून ऑनलाईन हडप केलेली ४५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली. पुंडलिक नगर पोलिसांनी २ खुनाचे गुढ उकलून काढले. सिडको पोलिसांनी वाहन चोरांची मोठी टोळी जेरबंद केली. मंगळसूत्र चोरांना देखील सिडको पोलिसांनी जेरबंद केले. मात्र, तोतया पोलिसांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरातून ८३६ वाहने चोरीला गेली आहेत. त्यापैकी केवळ २०० वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तर, एकूण १३७३ चोऱ्यांपैकी केवळ ३४९ चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.