महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला दिन विशेष - जयश्री जोशी यांची भरारी, मसाले उद्योगात कोटींचे उड्डाण - Aurangabad District Latest News

टीव्हीमध्ये सुरू असणाऱ्या काही सिरियल्समध्ये महिलेने मसाला उद्योग सुरू करत मोठी झेप घेतल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र अशीच भरारी औरंगाबादच्या जयश्री जोशी यांनी घेतली आहे. गेली बावीस वर्षे परिश्रम घेत उभारलेल्या "आदीश्री" ने वटवृक्षाचे रूप घेतले आहे.

जयश्री जोशी
जयश्री जोशी

By

Published : Mar 8, 2021, 5:43 AM IST

औरंगाबाद - टीव्हीमध्ये सुरू असणाऱ्या काही सिरियल्समध्ये महिलेने मसाला उद्योग सुरू करत मोठी झेप घेतल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र अशीच भरारी औरंगाबादच्या जयश्री जोशी यांनी घेतली आहे. गेली बावीस वर्षे परिश्रम घेत उभारलेल्या "आदीश्री" ने वटवृक्षाचे रूप घेतले आहे.

वीस वर्षांत 60 उत्पादन

1998 साली औरंगाबादच्या जयश्री जोशी यांनी आपली शिक्षकी नौकरीचा त्याग करत गृह उद्योग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना नऊ वर्षाची आसावरी आणि सहा महिन्यांची अदिती अशा दोन मुली होत्या. त्यामुळे उद्योग सुरू करणे तसे आव्हानात्मक बाब होती. मात्र पती उज्वल जोशी यांच्या पाठबळामुळे थोडा धीर धरत त्यांनी "आदीश्री" नावाने गृह उद्योगाला सुरुवात केली. सुरुवातीला दहा हजारांची एक मशीन आणि काही साहित्य त्यांनी विकत घेत उपवासाचे पदार्थ तयार करायला सुरुवात केली. त्यावेळी उपवास भाजणी आणि राजगिरा भाजनी असे दोन पदार्थ त्यांनी बाजारात आणले, त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता हळूहळू उत्पादनं वाढत गेली आणि आदीश्रीची 60 पेक्षा अधिकची उत्पादनं लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. काही हजारांचा टर्नओव्हर असलेल्या उद्योगाने एक कोटींचा पल्ला गाठला.

जयश्री जोशी यांची भरारी, मसाले उद्योगात कोटींचे उड्डाण

संकटांवर यशस्वी मात

गृह उद्योग सुरू करत असताना अनेक अडचणी जयश्री जोशी यांना आल्या. मात्र या अडचणींवर संयमाने मात करत त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. अनेक वेळा स्वतः कडे असलेली यंत्रणा, तर कधी कामगार यांच्या अडचणी आल्या. त्या वेळेस स्वतः रात्रभर सर्व काम जयश्री आणि त्यांचे पती उज्वल यांनी काही कामगारांच्या मदतीने पूर्ण केलं. मिळालेल्या ऑर्डर पूर्ण करायच्या, त्या वेळेत दुकानदारांपर्यंत पोहोचवयाच्या आणि त्याच वेळी मुलांचा पण सांभाळ करायचा अशी कसरत जयश्री यांनी सातत्याने सुरू ठेवली. मिळालेल्या कामात तयार केलेल्या मसाल्यांची चव बदलणार नाही याची काळजी नेहमी घेतली, मसाले वापरणाऱ्या ग्राहकांना आपल्याच घरी मसाले तयार केल्याचा अनुभव यावा. यासाठी वेगवेगळे प्रयोग नेहमी केले. चार महिलांना सोबत घेऊन सुरू केलेल्या या उद्योगात आता 100 हून अधिक महिलांना रोजगार देता आला. 22 वर्षांत मिळत असलेला प्रतिसाद ही कामाची पावती असल्याचं मत जयश्री जोशी यांनी व्यक्त केलं.

कुटुंबीयांची साथ मिळाल्यानेच उद्योगात यश

जयश्री जोशी यांचे पती उज्वल जोशी कृषी विभागात कार्यरत होते. चांगली नोकरी असूनही आपल्या घरातल्या स्त्रीने काहीतरी करावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जयश्री यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गृह उद्योग सुरू करण्यासाठी मदत त्यांनी केली. दिवसभर नोकरी केल्यानंतर घरी आल्यावर तयार झालेले मसाले दुकानांपर्यंत पोहोचवायचे. नव्याने अजून काही काम मिळेल का? यासाठी प्रयत्न करणे अशी भक्कम साथ उज्वल जोशी यांनी दिली. काम वाढत असताना त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी देखील उज्वल जोशी यांनी मदत केली. त्यामुळेच आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आदीश्री मसाले बाजारात दाखल झाले आहेत. शंभर कामगार कामाला असूनही कोणत्याच कामगाराचा स्पर्श मसाल्याला लागणार नाही. आरोग्यवर्धक असे मसाले ग्राहकांना देणं शक्य झालं. त्यात मोठी मुलगी आसावरी आणि लहान मुलगी अदिती यांनी लहान वयात दाखवलेला समजूतदार पणा यामुळे यश मिळवणे सोपे झाले अशी भावना जयश्री जोशी यांनी व्यक्त केली.

22 वर्षात मिळालेले 20 पुरस्कार

1998 साली आदीश्री मसाले बाजारात यायला सुरुवात झाली. सुरुवातीला मोजक्याच पद्धतीचे मसाले बाजारात आणल्यावर चांगला प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे आत्मविश्वास बळावलेल्या जयश्री जोशी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि पदार्थ बाजारात आणायला सुरुवात केली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना विविध सामाजिक संस्थांतर्फे पुरस्कार देण्यात येऊ लागले. गेल्या 22 वर्षांमध्ये वीस नामांकित सामाजिक संस्थांचे पुरस्कार आदीश्री मसालेला मिळाले आहेत. मात्र या पुरस्कार पेक्षाही एक वेगळाच पुरस्कार माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणीय राहील, तो पुरस्कार म्हणजे "मातृ गौरव" पुरस्कार. मोठी मुलगी आसावरीने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आई म्हणून मिळालेला सत्कार, हा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम सत्कार आहे. गृह उद्योग चालवत असताना कुटुंबाकडे लक्ष देणं शक्य होत नव्हतं. मात्र मिळेल तसं मुलांशी संवाद साधणे आणि त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करणे इतकच मी केलं. यातही मुलीने केलेल्या कामगिरीबद्दल माझा सत्कार झाला. त्यामुळे आई म्हणून हा सत्कार मला मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा जास्त आवडता पुरस्कार आहे, असं मत जयश्री जोशी यांनी व्यक्त केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details