छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):पोलीस विभागाच्या महिला तक्रार निवारण केंद्र म्हणजे भरोसा असेल यांच्याकडे कौटुंबिक तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. यात महिला आपल्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाबद्दल तक्रार नोंदवतात. त्यामध्ये अनेक वेगवेगळी कारणे नमूद केलेली असतात. ज्यामध्ये नवऱ्याकडून दारू पिल्यानंतर होणारी मारहाण, सासू-सासऱ्यांकडून केला जाणारा छळ, तर कधी पैशांसाठी दिला जाणारा त्रास यांचा समावेश असतो. अशावेळी दोन्ही बाजूने त्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यात तोडगा काढण्याचे महत्त्वाचे काम महिला पोलीस बजावतात. दिवसभर येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दिवस-रात्र तक्रार सोडवण्यासाठी प्रयत्न महिला पोलीस करतात.
अनेक वेळा होतात आरोप:महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार आल्यानंतर महिलेची सविस्तर तक्रार ऐकून घ्यावी लागते. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींना त्याबाबत विचारणा केली जाते. यामध्ये जर महिलेला खरंच त्रास दिला आहे का याबाबत स्पष्टता झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी समुपदेशन महिला पोलीस करतात. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी किंवा नियमाने दिलेला कालावधी देण्यात येतो. त्यानंतरही महिलेचा पती किंवा सासू-सासरे यांच्या वागणुकीत सुधारणा होत नसेल तर, शेवटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाते. तसे करत असताना खरंच त्यांची चूक आहे का? याची खातरजमा महिला पोलीस करतात. असे असले तरी गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने भरोसा सेलच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर, महिला आहे तर महिलांनाच साथ देतात. महिलांच्या बाजूने कायदे असल्याचा गैरफायदा उचलतात असा आरोप भरोसा सेलवर केला जातो. मात्र प्रत्यक्षात योग्य बाजू कोणाची हे पडताळल्यावरच आम्ही पावले उचलतो असे मत ग्रामीण भरोसा सेल पोलीस अधिकारी आरती जाधव यांनी सांगितलं.