औरंगाबाद -शहरातील महिलांनी वटपौर्णिमा पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरी केली आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना करत शहरातील सर्वच भागांमध्ये महिलांनी आज वडाच्या झाडांची पूजा केली.
शहरातील विविध भागात आज वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे सात फेर बांधले आणि तिथे उपस्थित असणाऱ्या महिलांना वाण दिले. तर याचबरोबर हिरव्या बांगड्या, हळकुंड, सुपारी, बदाम यासह आंबा वाहून ही पूजा करण्यात आली आहे. जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने वडाची पूजा करताना ठिकठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत.
पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाभोवती हा पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला आहे. आपल्या व्रताने पती सत्यवानाचे प्राण परत मिळविण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले होते, अशी आख्यायिका या सणाबद्दल सांगितली जाते.
'जन्मोजन्मी हाच पती मिळो' म्हणत महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा
आजच्या आधुनिक युगात हा दिवस तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. हिंदू धर्मातील सण प्रथा परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा या प्रार्थनेबरोबर वृक्षपुजा हा सुद्धा वटपौर्णिमेचा हेतू आहे.