औरंगाबाद - कोरोना योद्ध्यांना सर्वतोपरी सुविधा देण्याचा दावा प्रत्येक वेळी केला जातो. मात्र त्या मिळतात का? हा प्रश्न आहे. असं असलं तरी काही कोरोना योद्धे कुठल्याही प्रकारची मदत न घेता, हाल सहन करत आपलं कर्तव्य बजावत आहेत. शासकीय रुग्णालयात काम करणारी एक सफाई कामगार महिला रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून, कोरोना काळात कर्तव्य बजावत आहे. या महिलेचं नाव आहे सुमन मोघे.
रोजचा दहा किलोमीटर पायी प्रवास
औरंगाबादपासून 25 किलोमीटरवर असलेल्या बिडकीन शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून सुमन मोघे ह्या गेल्या पाच वर्षांपासून काम करतात. कोविड काळात न थकता त्या आपलं कर्तव्य बजावत आहेत. कामाच्या ठिकाणापासून त्यांच्या घराचं अंतर पाच किलोमीटर इतके लांब आहे. मात्र जाण्या-येण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने, त्यांना रोज जाऊन-येऊन 10 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतोय. पण याचं आपल्याला कधीच दुःख वाटत नसल्याचं सुमन अभिमानाने सांगतात. कारण आज मी जे काम करत आहे त्याचा मला अभिमान असून, सफाई कामगार का होत नाही, पण देशासाठी आपण काहीतरी करत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.