औरंगाबाद- मराठा समाजाला पुढच्या ८ दिवसात न्याय द्या, अन्यथा मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारला दिला. औरंगाबादमध्ये मराठा समाजाची एक बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षण संदर्भात पुढील वाटचालीबाबत विचारविनिमय करण्यात आला.
मराठा आरक्षण याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण कायम राहील, असे सांगण्यात आले होते. मात्र, सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमातील मुंबई येथील प्रवेश प्रक्रिया रद्द केली असल्याने सरकारच्या भूमिकेबाबत संशय येत असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार आपण सकारात्मक आहोत, असे सांगत आहे. त्यांनी आपली एक भूमिका जाहीर केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात सरकार बाजू मांडायला कमी पडले आहे. त्यामुळे, राज्यभर सरकार विरोधात मराठा समाज बांधव संतप्त झाले आहेत. असे मत विनोद पाटील यांनी व्यक्त केले.