औरंगाबाद -पतीची भेट घेण्यासाठी एका विवाहितेने चक्क सासुरवाडीला रस्त्यावर बसून आंदोलन केल्याचा प्रकार वैजापूर तालुक्यात घडला आहे. प्राजक्ता डहाळे, असे या विवाहितेचे नाव आहे. नवरा अमेरिकेत असून सासुरवाडीचे लोक पतीशी बोलू देत नसल्याने प्राजक्ताला तिच्या आई वाडीलांसह हे आंदोलन करावे लागले.
औरंगाबादच्या प्राजक्ताचा विवाह वैजापूर येथील सचिन उदावंत यांच्याशी झाला. सचिन अमेरिकेत नोकरी करत असल्याने आपली मुलगी विदेशात संसार करणार, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती. सचिनच्या वडिलांचे वैजापूर येथे सोन्या चांदीचे दुकान आहे. चांगल्या घरात मुलगी देताना लग्नात काही कमी पडू नये म्हणून प्राजक्ताच्या वडिलांनी औरंगाबादच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये २ दिवसांचा शाही विवाह सोहळा केला. मात्र, लग्न झाल्यावर सचिनने कधीही प्राजक्ताचा पत्नी म्हणून स्वीकार केला नाही. उलट प्राजक्ताला अमेरिकेत नेऊन त्याने मोलकरणीसारखी वागणूक दिली आणि व्हिसा संपल्यावर तिला भारतात पोहोचवून अमेरिकेला माघारी गेला तो परत आलाच नाही.
इकडे प्राजक्ताच्या सासरच्या मंडळींनीही सून म्हणून स्वीकार केला नाही. तिच्यावर अत्याचार केले, तिला घरातून वेगळे काढले. पती सचिनने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला आणि स्वतःचाही मोबाईल क्रमांक बदलला. त्यामुळे प्राजक्ताला त्याच्याशी बोलणे अशक्य झाले. यात सासरची मंडळी पतीशी बोलू देत नसल्याने प्राजक्ता आणि तिच्या आई वडिलांनी सासुरवाडी समोरच आंदोलन केले. घरचा वाद बाहेर काढायचा नव्हता. मात्र, दुसरा पर्याय नसल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे आई वडिलांनी सांगितले.