औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील तिडी गावाजवळ अज्ञात अंध व्यक्तीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता. स्थनिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा अवघ्या सहा तासात छडा लावला आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने अंध पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. यासिन शेख वजीर शेख (रा.कसाबखेडा, ता.खुलताबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गावातील सय्यद अश्रफ सय्यद नूर या अंध व्यक्तीची तिडी ते संवदगाव रस्त्यावरील रघुनाथ डुकरे यांच्या शेतात डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीनी त्यांचा मृतदेह जाळून टाकला होता. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावले होते. पोलिसांनी खबऱ्यांना अॅक्टिव्ह करत अवघ्या सहा तासात या मर्डरचा उलगडा केला आहे.
धक्कादायक म्हणजे पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने ही हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने कबुली दिली की, मृत सय्यद अश्रफ यांची पत्नी आणि आरोपी यासिन हे दोघेही कासाबखेडा या गावातीलच रहिवासी आहेत. दोघांचे मागील पाच ते सहा वर्षापासून अनैतिक संबंध होते. याची कुणकूण मृत अश्रफ यांना लागली होती. पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नी आणि त्याच्या प्रियकराने काटा काढण्याचे ठरवले. दोन दिवसापासून धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या अश्रफ यांना भूलथापा देत निर्जनस्थळी नेण्यात आले व त्यानंतर डोक्यात वार करून त्यांची हत्या केली. तसेच चेहरा ओळखू येऊ नये म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.