औरंगाबाद - महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात भक्ती वाघिणीने ३ एप्रिलला पहाटे दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. मात्र तिच्यामुळेच एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ६ एप्रिलच्या रात्री भक्ती वाघीण पिंजऱ्यामध्ये फिरत असताना एका बछड्यावर तिचा पाय पडला होता. यामुळे पिलाला वेदना झाल्या. हा बछडा कमी दूध पीत होता. याच कारणामुळे दोन पांढऱ्या बछड्यांपैकी एका बछड्याचा शनिवारी मृत्यू झाला.
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील पांढऱ्या रंगाचा वीर वाघ आणि पिवळ्या पट्टेरी रंगाची भक्ती वाघीण या जोडीने ३ एप्रिल रोजी दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला. भक्ती या वाघिणीची बछड्याना जन्म देण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र भक्तीने बछड्यांना जन्म दिल्यानंतर तिच्यामध्ये मातृत्वाची भावना दिसून येत नसल्याचे आढळून आले. ती बछड्याची काळजी घेत नव्हती, तसेच ती स्वतः बछड्यांना दूध पाजत नसल्याचे दिसून आले. याच दरम्यान एका बछड्यावर भक्तीचा पाय पडल्याने तो जखमी झाला होता. त्यामुळे केअर टेकर यांना त्या बछड्यांना बाटलीबंद दूध पाजावे लागले होते.