औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात समृद्धी वाघीणीने ४ बछड्यांना जन्म दिला आहे. यामध्ये २ दुर्मिळ अशा पांढऱ्या, तर २ पिवळ्या वाघांचा समावेश आहे. या बछड्यांमुळे प्राणी संग्रहालयातील वाघांची संख्या आता १२ वर गेली आहे.
औरंगाबादेतील प्राणी संग्रहालयात वाघीणीने पांढऱ्या बछड्यांना दिला जन्म
राज्यात मुंबई, पुणे, नागपूरसह इतर ठिकाणी प्राणी संग्रहालय आहेत. मात्र, सर्वाधिक १२ वाघ औरंगाबाद शहरातील प्राणी संग्रहालयात आहेत.
प्राणी संग्रहालयात अपुरी जागा असल्यामुळे काही काळ वाघ आणि वाघीणींना वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात येत होते. मात्र, वाघांची देशातील घटती संख्या लक्षात घेऊन दोघांना पुन्हा सहवासात सोडण्यात आले होते. तीन महिन्याच्या कालावधीनंतर शुक्रवारी रात्री ८ वाजता समृद्धीने पहिल्या बछड्याला जन्म दिला. त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आणखी तीन बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे या उद्यानातील वाघांची संख्या आता १२ वर गेली आहे. २ वर्षांपूर्वी याच वाघीणीला ३ बछडे झाले होते. त्यातील १ पांढरा वाघ होता.
बछड्यांचा जन्म झाल्याची माहिती मिळताच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून बछड्यांच्या जन्माचे स्वागत केले. समृद्धी आणि चारही बछड्यांची प्रकृती ठणठणीत आहे. तसेच ३ महिने त्यांची काळजी घ्यावी लागणार असल्याचे डॉ. नितीसिंग चौव्हाण यांनी सांगितले. राज्यात मुंबई, पुणे, नागपूरसह इतर ठिकाणी प्राणी संग्रहालय आहेत. मात्र, सर्वाधिक १२ वाघ औरंगाबाद शहरातील प्राणी संग्रहालयात आहेत. २००५ मध्ये महापालिकेने चंदीगड येथून गुड्डू, दीप्ती, कमलेश, छोटू असे ४ वाघ आणले होते. त्यांच्यापासून आतापर्यंत १६ वाघांनी जन्म घेतला आहे.