कन्नड(औरंगाबाद) - ना मंडप ना सनई चौघडा...आकाशाचा मंडप केला....अन् शेतातील झाडाची सावली आणि पक्ष्यांची किलबिलच झाले वाद्य... अशा या निसर्गरम्य वातावरणात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गुरुजींनी विधी पूर्वक लग्नाची रेशीमगाठ बांधली. दुचाकीवर आलेल्या वऱ्हाडीसमवेत नववधु सासरी गेली.
कन्नड तालुक्यातील हरसवाडीत लॉकडाऊनच्या नियमाप्रमाणे पार पडला विवाह सोहळा - कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लग्न
विवाहासाठी वरासहित चार जण दुचाकीवरून आले होते. तर वधु पक्षाकडून वधु सहीत केवळ ६ जण, गुरुजी आणि तीन पोलीस कर्मचारी उपस्थित होते. विवाहस्थळी सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाबरोबरच वधुवरासहीत सर्वांनी चेहऱ्यावर मास्क बांधले होते.
नागद परीसरातील हरसवाडी येथे शेतजमीन ( गट क्र. ११ ) मध्ये आकाशाच्या मंडपात बदामाच्या झाडाखाली सुकलाल परदेशी यांची कन्या दिपाली हिचा विवाह सुपडू महादु मरमट रा. वाकी ता. जामनेर जि. जळगाव यांचा मुलगा वर करण याच्यासोबत सोमवारी पार पडला. विवाहासाठी वरासहित चार जण दुचाकीवरून आले होते. तर वधु पक्षाकडून वधु सहीत केवळ ६ जण, गुरुजी आणि तीन पोलीस कर्मचारी उपस्थित होते. विवाहस्थळी सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाबरोबरच वधुवरासहीत सर्वांनी चेहऱ्यावर मास्क बांधले होते. परदेशी समाजातील हा विवाह सोहळा त्यांच्या रुढी परंपरानुसार पार पडला. विवाह विधी पूर्ण झाल्यानंतर नववधुला घेऊन वऱ्हाडी दुचाकीवरूनच आपल्या गावी परतले.
ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल ऩेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नागद पोलीस चौकीचे जमादार जे. पी सोनवणे, पोलीस हेड कॉन्सटेबल गणेश जैन, पोलीस पाटील दिपक कृष्णा कोळी यांच्या उपस्थीतीत हा विवाह सोहळा पार पडला. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर अत्यंत मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे नागद भागात सर्वत्र कौतूक होत आहे.