औरंगाबाद -जुलै महिना संपत आला तरी पैठणमध्ये गोदावरी नदीकाठी असलेल्या १८ गावांमध्ये पाऊस पडलेला नाही. नदी काठच्या आपेगाव व हिरडपुरी या गावांतील निम्नबंधारे अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. शेतजमिनी ओस पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडले आहे.
पैठणकडे पावसाने फिरवली पाठ, तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त - farmer's trouble
महाराष्ट्रातील पैठण तालुक्यात काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या १८ गावांना तर दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे.
![पैठणकडे पावसाने फिरवली पाठ, तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3942694-thumbnail-3x2-paithan.jpg)
पावसाळा सुरू होऊन जवळपास पन्नास दिवस होत आले आहेत. महाराष्ट्रातील पैठण तालुक्यात काही भागात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. पैठणवर सलग चौथ्या वर्षी भीषण पाणीटंचाई व दुष्काळाचे संकट आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या १८ गावांना तर या दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. पाटेगाव, मायगाव, वडवाळी, वाघाडी, नवगाव, ऊंचेगाव, आपेगाव, आगरनांदूर, हिरडपुरी, घेवरी, टाकळीअंबड, तुळजापूर व हिरडपुरी या गावांना संभाव्य दुष्काळी परिस्थितीने हतबल केले आहे. वाहत्या नदीकाठाच्या परिसरातील ही गावे बकाल बनत चालली आहेत. वरुणराजाला अद्यापही दया आली नसल्याने शेतात पेरण्या झालेल्या नाहीत. अशा भयावह संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा धीर सुटत चालल्याचे चित्र आहे.
आपेगाव व हिरडपुरी या बंधाऱ्यांतुन परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी लाखोंचा खर्च करून पाण्यासाठी पाईपलाईन टाकल्या आहेत. मात्र गेल्या ३ वर्षापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प होत चालल्याने हे बंधारे निकामी बनले आहेत. त्यातच यावर्षी पैठणच्या नाथसागरातुनही या बंधाऱ्यांत पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी परिसरातील उसाचे पीक करपून गेले आहे. कपाशी, तुर, मुग, बाजरीची लागवडच न झाल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बी-बियाणे आता दुकानदारांना परत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.