औरंगाबाद - नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण 92 टक्के भरले असून, सद्या धरणाच्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्युसेक तसेच जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. दोन वर्षांनंतर जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार असल्याने पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
जायकवाडी धरणात ९२ टक्के पाणीसाठा; दोन दरवाजे उघडले - कार्यकारी अभियंता जायकवाडी धरण
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण 92 टक्के भरले असून, सद्या धरणाच्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्युसेक तसेच जलविद्युत केंद्रातून १५८९ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.

मागील महिन्यात नाशिकसह नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन दिवसात पाण्याचा ओघ कमी झाल्याने धरणाचे दरवाजे यावर्षी तरी उघडणार का असा प्रश्न होता. धरणात 96 टक्के पाणीसाठा झाल्यावर दरवाजे उघडणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, 92 टक्के पाणीसाठा होताच जायकवाडीचे दोन दरवाजे उघडण्यात आले. धरणाच्या दरवाजा क्रमांक 10 आणि 27 मधून 1050 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात असून, सद्या धरणात पाण्याची आवक 5000 क्युसेक आहे. या विसर्गामुळे गोदावरी नदी भरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाच्या डाव्या कालव्यातून 1400 व उजव्या कालव्यातून 900 क्युसेकने विसर्ग होत आहे. तसेच सायंकाळी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने तसेच रात्री अकराच्या दरम्यान, पुन्हा दोन दरवाजे अर्ध्या फुटाने खाली करून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांसाठी धरणाचे हे दृश्य म्हणजे परवणीच ठरली आहे.