औरंगाबाद- वाळूज महानगर भागातील सजापूर आणि तिसगाव भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे समोर आली आहे. एका घराच्या सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे कैद झाले आहेत.
वाळूजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चार ते पाच लाखांचा ऐवज लंपास
चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे समोर आली आहे. एका घराच्या सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे कैद झाले आहेत.
वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या सजापूर शिवारात शेख सलीम शेख अब्दुल्लाह यांचे दुमजली घर आहे. चोरट्यांनी इमारतीच्या गेटचे कुलूप तोडून रोख 60 हजार, चार तोळे सोने तसेच इतर साहित्य असा सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर दुसरी घटना तिसगाव येथील पुनमचंद कसुरे यांच्या घरी चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांच्या घरी चार ते पाच दरोडेखोर आले. कुत्रा भुंकल्याने कसुरे जागे झाले. त्यांनी दरोडेखोरांना पाहून आरडाओरड केली असता गावकरी जागे झाले. गावकरी जागे झाल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला. ही घटना देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.