औरंगाबाद- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सातत्याने अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर महाराष्ट्र नव निर्माण सेना आपल्या पक्षाच्या विचारधारेसह झेंडाही बदलण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर झेंड्याची पहिली झलकही समोर आली होती. मात्र, मनसेच्या नव्या झेंड्यावर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. पक्षाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरू नका, अशी विनंती करणारे पत्र विनोद पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे.
मनसेचा झेंडा वादाच्या भोवऱ्यात.. मराठा आरक्षण याचिकाकर्त्यांनी पाठवले पत्र
छत्रपती शिवाजी महाराज जरी कोणाच्या मालकीचे नसले तरीही राजमुद्रेला एक वेगळे महत्त्व आहे. राजमुद्रेचा राजकीय पक्षासाठी वापर करू नये, असेही विनोद पाटील म्हणाले. झेंड्यासंदर्भात करण्यात आलेल्या विनंतीची दखल घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी ठाकरे यांना केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जरी कोणाच्या मालकीचे नसले तरीही राजमुद्रेला एक वेगळे महत्त्व आहे. राजमुद्रेचा राजकीय पक्षासाठी वापर करू नये, असेही विनोद पाटील म्हणाले. तसेच झेंड्यासंदर्भात करण्यात आलेल्या विनंतीची दखल घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी ठाकरे यांना केले आहे.
राज ठाकरेंच्या मनसेचा जुना तीन रंगांचा झेंडा कात टाकणार असल्याचे दिसून येत आहे. लवकरच पक्षाचा नवा झेंड्याचे विमोचन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या झेंड्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असल्याची पहिली झलक समोर आली आहे. भगव्या रंगाच्या झेंड्यावर राजमुद्रा असे मनसेच्या नव्या झेंड्याचे रूप असणार आहे. त्यावरूनच मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ता विनोंद पाटील यांनी विरोध केला आहे. या पद्धतीने शिवरायांची राजमुद्रा वापरू नये, अशी विनंती त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यात काही बदल करणार की नव्या वादाला तोंड फुटणार, हे येणारा काळंच ठरवेल.