औरंगाबाद - साई जन्मस्थळावरून सुरू असलेल्या वादात आता जिल्ह्यातील धूपखेडा येथील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे. साईबाबा यांचे प्रगटस्थान धुपखेडा असून ते सर्वात आधी येथेच दिसले, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय या परिसराचा विकास करण्यासाठी निधी देण्यात यावा, असा ठरावही ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
धुपखेडामध्ये साईबाबा सर्वप्रथम दिसले, ग्रामस्थांचा दावा हेही वाचा - पाथरीकरांना मुंबईचे निमंत्रणच नाही; मंगळवारच्या बैठकीत पुढील आंदोलनाचा निर्णय होणार
'साईबाबा यांच्या चरित्रात उल्लेख असलेले चांदभाई हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील धुपखेडा येथे पोलीस पाटील होते. त्यांनाच साईबाबा सर्वात आधी दिसले. बाबांनी त्यांना काही चमत्कार दाखवले. त्यानंतर चांदभाईंनी बाबांना धुपखेड्याला आणले आणि त्यानंतर काही दिवसांनी बाबा शिर्डीला गेले', असा दावा धुपखेड्याच्या ग्रामस्थांनी केला. धुपखेडा विकासाची मागणी आजची नसून खूप जुनी असल्याचा दावा माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केला.
हेही वाचा - 'असे' आहे साईबाबांचे पाथरीतील जन्मस्थळ; जातं, उखळ अन् बरंच काही...
साईबाबा धुपखेड्याच्या डोंगरात फिरत होते. त्यावेळी चांदभाई यांचा घोडा हरवला होता. तो घोडा साईबाबा यांनी शोधून दिला. त्यावेळी साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट झाली. चांदभाई यांनी त्यांना धुपखेड्याच्या आणले. त्यावेळी जगाला साईबाबा यांची ओळख झाली. या गावात राहत असताना साईबाबा अनेकवेळा गायब व्हायचे. ते लिंबाच्या झाडावर जाऊन बसायचे. ज्या झाडावर बाबा बसायचे, त्या झाडाचा पाला आजही कडू लागत नाही, असा दावा ग्रामस्थ करतात.
'जवळपास तीन ते चार वर्षे साईबाबा धुपखेड्याला राहिले. लोकांना त्यांनी चांगले वागायची शिकवण दिली. ज्या झाडावर ते बसायचे, तो परिसर आजही पूजनीय आहे. काही वर्षांच्या वास्तव्यानंतर ते शिर्डीला गेले आणि स्थायिक झाले, अशी आख्यायिका धुपखेडावासिय सांगतात.
हेही वाचा - ...म्हणून शिर्डीकरांचा पाथरीला विरोध; परभणीतील साईभक्तांचा आरोप
पाथरी आणि शिर्डीसोबतच या स्थळाचाही विकास करण्यात यावा, अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत. ग्रामसभेत याबाबतचा ठराव मंजूर करून या परिसराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती करण्यात आली आहे.