औरंगाबाद - ग्रामीण भागात कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाल्याने धास्तावलेल्या ग्रामस्थांनी अनोळखी व्यक्तींना गावात 'नो एन्ट्री' केली आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आपेगावातही ग्रामस्थांनी गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर काट्या टाकून रस्ता बंद केला आहे.
औरंगाबाद : गावा-गावात वेशीवर काट्या टाकून रस्ते केले बंद - corona aurangabad
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची झपाट्य़ाने वाढ होत असल्याने तालुक्यातील गावागावात आता बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी असलेले फलकच गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत.
शहरात कामासाठी गेलेल्या अथवा नोकरीला असलेल्या व्यक्ती कुटुंबासह आपल्या मूळ गावी परतत आहेत. औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची झपाट्य़ाने वाढ होत असल्याने तालुक्यातील गावागावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी असलेले फलकच गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत. गावात साधी सर्दी, ताप, खोकल्याचा रुग्ण जरी आढळला तरी गल्लीत धावपळ होताना दिसते. शिवाय गावातील मंदिर आणि इतर धार्मिक स्थळावरून ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सूचना केल्या जात आहेत. बाहेर गावातून कुणी येत असेल तर त्याची माहिती ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाला द्यावी असे सांगितले जात आहे.
गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर अनेक काटेरी झुडपे, दगड, लाकूड टाकले आहेत. तसेच येथे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करणे अतिशय अवघड झाले आहे. तर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात दि.30 आणि येत्या 1 तारखेला असे दोन दिवस संपूर्णपणे लॉकडाऊन राहील. मेडीकल स्टोअर्स व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद रहाणार आहेत. विनाकारण कोणी घराबाहेर आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.