औरंगाबाद- गावामध्ये विकास झाला नाही म्हणून मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, गावात मोबाईलला रेंज नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा अजब निर्णय औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील कळंकी गावाने घेतला आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
कंळकी गाव दुर्गम आणि डोंगराळ भागात असल्याने गावाचा इतर भागांचा संपर्क होत नाही. गेल्यावर्षी गावात बीएसएनल आणि एका खासगी मोबाईल कंपनीचा टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र, एक वर्ष होऊनही सेवा सुरु झाली नाही. त्यामुळे गावात बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने कळंकी गावातील अनेक ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. या शिवाय इतर सुविधांच्या बाबतीत नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.