औरंगाबाद- केरळ येथील गर्भवती हत्तीच्या घटनेनंतर कुत्र्याला दोरीने बांधून दुचाकीने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानुसार दोघांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या अजबनगर परिसरात एका कुत्र्याला दुचाकीवर बसलेले दोन जण फरफटत नेत असल्याचा प्रकार घडला. त्यावेळी एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर श्वान प्रेमींनी या घटनेचा शोध घेत क्रांतिचौक पोलिसात याबाबत तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या 14 सेकंदाच्या व्हिडिओत या घटनेची क्रूरता दिसून येते. दुचाकीवर दोन जण वेगात जात आहेत. पाठीमागे बसलेल्या इसमाचा हातात साखळी असून त्या साखळीच्या माध्यमातून एका कुत्र्याला ओढत नेले जात आहे. कुत्रा त्रास होत असल्याने ओरडत आहे. मात्र, दुचाकीवरील व्यक्ती निर्दयीपणे त्याला ओढून नेत आहे. या व्हिडिओत कुत्र्याला दिलेला त्रास पाहून श्वानप्रेमींनी संताप व्यक्त केला.
पुष्कर शिंदे, अनुज धुप्पड, अमृता दौलताबादकर, रोहित नांदूरकर, अनुप मावलवार आणि पौर्णिमा पंजाबी या श्वान प्रेमींनी हा घटनेचा शोध घेतला. व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतल्यावर अजबनगर येथे शुक्रवारी (दि. 5 जून) सायंकाळी हा व्हिडिओ काढल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार श्वानप्रेमींनी क्रांतिचौक पोलिसात तक्रारी नोंदवली. त्यानुसार दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -विहिरीत सापडला अन्वीच्या तलाठ्याचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय