औरंगाबाद- भाजप सरकारमधील लोक काँग्रेससारखे खात नाहीत, तर यांची खान्याची पद्धत वेगळी आहे. जे काम पूर्वी लाखात होत होते, त्यासाठी आता पाच लाख लागत आहेत. भाजप सरकारमधील मंत्री मस्तवाल झाले आहेत. त्यामुळेच तोंडाला येईल ते बडबडत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. एमआयएमचे प्रमुख औवेसी चांगले असल्याचे सांगत, ओवैसींच्या भोवतीचे लोक स्वच्छ नसल्याचा टोला खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता लगावला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची सोमवारी सायंकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांकडून जी भाषा वापरली जात आहे ती लोकशाहीची नाही तर हुकूमशहाची भाषा आहे, ती लोकशाहीत शोभत नाही. पाच वर्षे सत्ता मिळते. मात्र, कायमची सत्ता मिळाल्याचा भास निर्माण केला जातो. मतांचा अधिकार राजकीय पक्षांना नाही. ज्याचे वय 21 वर्ष आहे तोच येथील राजा ठरवतो. तो दाखवून देईल की आपण राजे नाहीत आम्ही आहोत, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
गरिबांना गॅस सिलिंडर वाटण्याची योजना तेव्हा पण होती. मात्र, कमी प्रमाणात होती. 2020 पर्यंत घर देणार म्हणतात इंदिरा गांधींनी देखील इंदिरा आवास योजना सुरू केली त्यात नवीन काय? रस्त्यातील घोटाळा पाहायचा असेल तर सब काँट्रॅक्टरला विचारा मग कळेल. हे खाताना काँग्रेस सारखी निशाणी सोडत नाही. यांची खान्याची पद्धत वेगळी आहे. हे दुसऱ्याला खायला सांगतात आणि नंतर कमिशन मागतात, असा आरोप आंबेडकरांनी केला.
दुष्काळ जाहीर करावा म्हणून मोर्चे काढले जातात. शहरात दहा दिवस पाणी येत नाहीत त्याच्या समस्या वेगळ्या आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या आहे. आजूबाजूचे गाव कचरा टाकायला जमीन देत नाहीत. सरकारने पाच वर्षात शहरातील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी काय केले. पाच वर्षात कचऱ्यापासून वीज निर्माण करणारा प्रकल्प तयार केला का ते दाखवा, एक तरी शहर आहे का? हे सरकार कॉपी पेस्ट पद्धतीने चालले आहे.
मस्तवलेला सरकार आणि मस्तवलेला मंत्री म्हणाला सिनेमा गृह फुल आहेत मंदी कुठे आहे. नंतर त्याने माफी मागितली. या उधळलेल्या घोड्याला लगाम घालायला हवा. राहुल गांधी का आले माहीत नाही, कुंभकर्ण सारखे झोपले होते. राहुल गांधीला प्रेमाचा सल्ला देतो. राफेलवर बोलू नको, कॉलेजची पोर टिंगल उडवतात. राफेल वर अधिकृत बोलणारे फक्त मनमोहन सिंह आहेत. त्यांनाच खरे माहीत आहे. ज्या दिवशी ते बोलले त्या दिवशी मोदींचे कपडे फाटतील, असा ईशाराही त्यांनी राहूल गांधीना दिला. तसेच बँकेतील पैसे सुरक्षित ठेवायचे असेल तर वंचितच्या हातात सत्ता द्या, आम्हीच उधळलेल्या घोड्याचा लगाम सांभाळू शकतो, असा दावाही त्यांनी केला.
मुस्लिम समाज कधी न्याय देणाऱ्या समाजाच्या पाठीशी उभा राहिला नाही. दगडा खाली हात अडकले तर हात मोकळे होई पर्यंत वापर करून घेतला. विधान परिषदेला आज कोणाला मत दिल तर शिवसेनेला. त्यामुळे मुस्लिम समाजाला आवाहन करतो आपले राजकारण स्वच्छ करा. औवेसी चांगला माणूस आहे, पण त्यांच्या सोबत असलेला माणूस स्वच्छ नाही. फक्त गफार कादरी योग्य माणूस आहे. त्यामुळे त्यांनी वंचित आघाडीने त्यांना साथ दिली, असा टोला त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना लगावला.