औरंगाबाद - नागरिकत्व नोंदणी रजिस्टर (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व एनपीआर विरोधात वंचित बहुजन आघाडी हा एकटा पक्ष ठामपणे रस्त्यावर उतरुन विरोध करत असून, इतर पक्षांची भूमिका ही गोंधळ निर्माण करणारी आहे. तसेच भाजप फक्त मुस्लिमांना टार्गेट करुन असे कायदे करत असल्याचे अंजली आंबेडकर यांनी सांगितले आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने औरंगाबाद येथे पत्रकार परिषद यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा -इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा; तुर्तास तरी पीसीपीएनडीटी समितीचा कारवाईसाठी नकार
वंबआच्या महिला आघाडीच्यावतीने औरंगाबादेत मेळावा घेण्यात आला. यावेळी महिलांवरील होणाऱ्या अत्याचार विरोधात लढाई उभारण्यासाठी रुपरेषा ठरवण्याबाबत विचार मंथन करण्यात आले. यावेळी वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, राज्यात स्थापन झालेले सरकार त्यांची गरज असल्याने तयार झाले आहे. मात्र, त्यांच्यात असलेले मतभेद दिसून येत असून, ताळमेळ देखील नाही त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत मला शंका वाटत आहे. तसेच देशातील नागरिकांना नागरिकत्वाचा पुरावा मागून भाजप सरकार हिंदू मुस्लिम अशी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केली.
खैरलांजी प्रकरणात राष्ट्रवादीकडे गृह खाते होते त्यावेळी त्यांनी योग्य न्याय दिला असे वाटत नाही, आणि आज त्यांच्याकडेच गृहखाते असले तरी त्याच्याकडून काही अपेक्षा करण्यासारखी परिस्थिती दिसत नसल्याचे ठाकूर म्हणाल्या.