औरंगाबाद- वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. या मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळत असून मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब आंबेडकर दावेदार असल्याचे मत, वंचितच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करणार असल्याचे महिला प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले आहे.
पक्षातून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना बाळासाहेबांनी त्यांना जवळ केले. त्यांच्यात सुधारणा होईल असे वाटत होते. मात्र, ते पक्षातून बाहेर निघाले. पडळकर आल्यावर आपले पद धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटली असावी. सद्या बहुजन वंचित आघाडीकडे असंख्य लोक उमेदवारी मागत आहेत. चारित्र्य संपन्न, उच्च शिक्षित, पक्षातील कार्यकर्ता, सामाजिक जाण असणारे, ६० - ७० वर्षांपासून वंचित असलेल्या घटकांमधून असणाऱ्यांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे मत, अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.