औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या मदतीला ग्रामपंचायत विभाग उतरला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ४९ ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी (५ मार्च) लसीकरण, टेस्टींग शिबिर घेण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच व ग्राम सेवकांना दिले.
सर्वांपर्यंत लस पोहोचविण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील सर्वात मोठ्या ४९ ग्रामपंचायतींत सोमवारी लसीकरण व टेस्टींग शिबिर राबवण्यात येत आहे. यात गावातील सर्व दुकानदार, व्यापारी वर्गाची टेस्ट करण्यात येणार आहे. गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करण्यात येणार आहे. हे शिबिर शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रशासन अधिकाऱ्यांसोबत स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करण्यात येत आहे. गावातील लोकांमध्ये जनजागृतीसाठी दवंडी देणे, मंदिरातील लाऊडस्पीकरवर घोषणा करणे, पात्र लाभार्थ्यांची यादी करणे अशा सूचना सरपंच व ग्राम सेवकांना डॉ. भोकरे यांनी दिल्या आहेत. या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे. मोठी गावे झाल्यानंतर छोट्या गावात हे शिबिर घेण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांमध्ये लसीकरणाबाबतची भीती या शिबिरातून घालण्यास मदत होणार आहे.
१४१५ गावांमध्ये राबविण्यात येणार हे शिबीर
यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात टेस्टींग व लसीकरण केले जात होते. परंतु, नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता गावागावात हे शिबीर होणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोना लसीकरण, टेस्टींग करण्याचा प्रयत्न आहे. असे शिबिर जिल्ह्यातील १४१५ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी म्हटले आहे.
- औरंगाबाद जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीत होणार लसीकरण
१) सिल्लोड - अजिंठा, शिवना, घाटनांद्रा, अंधारी, अंभई
२) खुलताबाद - वेरूळ, गलेबोरगाव, गदाना, बाजारसावंगी
३) फुलंब्री- वदोडबजार, गणोरी, खमगाव, निधोना, पाल
४) गंगापूर - रांजणगाव शे. पु, वाळूज, जोगेश्वरी, हर्सूल सावंगी, कमलापूर
५) वैजापूर- लोणी खुर्द, बोरसर, नागमठाण, बेलगाव, चिकटगाव, मणूर व पोखरी
६) सोयगाव- फर्दापूर, निंबायती, घोसला, गोंदेगाव, किन्ही (बनोटी अंतर्गत), सावळदबारा
७) औरंगाबाद - पंढरपूर, दौलताबाद, करमाड, कुंभेफळ, दौलताबाद, वडगाव कोल्हाटी
८) कन्नड - पिशोर, नाचनवेल, चिकलठाणा, देवगाव रंगारी, नागद, चिंचोली, चापानेर
९) पैठण- बीडकीण, चित्तेगाव, डोरकीण, आडुळ ब्रु. विवाह मांडवा.
हेही वाचा -लोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई? प्रवाशांमध्ये संभ्रम कायम
हेही वाचा -यांना एजंट म्हणून ठेवलंयं की काय?, चंद्रकांत पाटलांचे मुश्रीफ यांना प्रतिउत्तर