औरंगाबाद - राज्यातील शेतकऱ्यांना फसवाल, तर याद राखा, तुमचे दुकान बंद करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा काढणाऱ्या विमा कंपन्यांना दिला. राज्यात लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून त्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याने शिवसेना आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभी राहिली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना फसवाल, तर तुमची दुकानं बंद करू, उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना इशारा - पीक विमा
राज्यात लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून त्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याने शिवसेना आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभी राहिली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पीकविम्यात अनेक घोटाळे झाले, ते आता बाहेर येत आहेत. लोकांच्या हक्काचे पैसे घेऊन पळून गेलेत. मराठवाडा संतांची भूमी असली तरी ज्यांना सरळ भाषा कळत नसेल तर त्यांना आमची भाषा दाखवू, विमा काढणारा मल्या किंवा नीरव मोदी नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवाल तर तुमची दुकाने बंद करू, मुंबईसह तुमची सर्वच कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांना दिला. निवडणुका येतात निवडणुका जातात. मात्र, आपले नाते टिकू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या विधानसभेत साथ देण्याचे आवाहन जमलेल्या शेतकऱ्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.