औरंगाबाद- कुत्र्याने चावा घेतल्यामुळे दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात घडली. अक्षरा राजू वावरे, असे या दोन वर्षीय मुलीचे नाव होते. अक्षरा घरासमोर खेळत असताना कुत्र्याने तिचा चावा घेतला होता.
मुकुंदवाडी येथे 25 ऑगस्टला दारात खेळत असताना मोकाट कुत्र्याने अक्षराच्या चेहऱ्यावर चावा घेतला. त्यानंतर तातडीने अक्षराच्या आई-वडिलांनी तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला रेबीज इंजेक्शन दिले होते. त्यानंतर इंजेक्शनचा दुसरा डोस देखील तिला दोन दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. मात्र, मंगळवारी रात्री अक्षराला ताप आला आणि ती अस्वस्थ झाल्याने तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.