गंगापूर (औरंगाबाद) -धुळे-सोलापूर समृद्धी महामार्गावर तीन दरोडेखोरांनी चारचाकी गाडी पळवत धूमाकुळ घातला. वरझडी फाट्यावर दरोडेखोरांनी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांना व चालकाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गाडी पळवली. सुसाट असलेल्या गाडीने फतियाबाद जवळ दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार चंद्रकांत वसंतराव बोडखे (वय 42) हा जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून तीन दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. योगेश राजदेव, उमेश राजदेव, देवेंद्र शिंदे असे दरोडेखोरांची नावे आहेत.
दरोडेखोरांनी गाडी अडवून केली मारहाण
महामार्गावर तीन दरोडेखोरांनी धूमाकुळ घालत चारचाकी वाहने अडवून मारहाण करून लुटमार केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डोणगाव येथील केवलसिंग सुलाने हे त्यांच्या वाहनाने (एमएच 20 डीव्ही 4245) ने कन्नड येथून औरंगाबादच्या दिशेने येत होते. रात्रीच्या सुमारास पिंपळगाव फाट्यावर तीन जणांनी त्यांची कार अडवून चाकूचा धाक दाखवत कार घेऊन पळ काढला. त्यानंतर या दरोडेखोरांनी रात्री साडेबाराच्या सुमारास वरझडी रोडवर नवीन गाडी अडवली. या गाडीत चिखली अर्बन बॅकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता व उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे गाडीचालक किशोर इंगळे यांनाही अडवत जबर मारहाण करण्यात आली. शिवाय दरोडेखोरांनी गाडी घेत पळ काढला. दरम्यान जखमी असलेल्या तिघांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.