औरंगाबाद -कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे अनेक संस्थाचालकांनी शिक्षकांना पगार दिलेले नाहीत. पगार मिळत नसल्याने शिक्षकांवर इतर व्यवसाय करण्याची वेळ आल्याचे वास्तव समोर येत आहे. औरंगाबादच्या दोन शिक्षकांनी एकत्र येत चिप्स विकण्यास सुरुवात केली आहे. सात महिन्यांपासून शाळा बंद असल्याने उपजीविका भागवण्यासाठी शिक्षकी पेशा बाजूला ठेऊन काम करत चिप्स विक्रीचे काम आहोत, अशी भावना या शिक्षकांनी व्यक्त केली.
शिक्षक विकत आहेत केळीचे चिप्स ज्ञानेश्वर माळी आणि अमोल जराड अशी या शिक्षकांची नाव आहेत. दोघेही चांगले मित्र असून पैठण तालुक्यातील एका इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि शाळा बंद पडली. शाळेत काम नसल्याने संस्था चालकांनी पगार देण्यास नकार दिला. त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्न पडला. दोघांनी केळीचे चिप्सकरून विकण्याचा निर्णय घेतला. सध्या ते उस्मानपुरा भागातील मुख्य रस्त्यावर केळीचे चिप्स विकण्याचा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायामुळे कुटुंब तरी चालेल, असा विश्वास त्यांना आहे.
ज्ञानेश्वर आणि अनिल या दोन मित्रांनी 2014मध्ये डीएड पूर्ण केले. त्यानंतर दोघेही सोबतच पैठण तालुक्यातील एका खासगी इंग्रजी शाळेत नोकरीला लागले. तेथे त्यांना 8 हजार रुपये पगार मिळत होता. मिळणारा पगार शेतीतील काही उत्पन्न असे मिळून त्यांचे कुटुंब चालत होते. मात्र, अचानक कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. शाळेने जरी पगार दिला नाही तरी संसाराचा गाडा मात्र, हाकावाच लागणार. म्हणून या दोन मित्रांनी परिस्थितीवर मात करण्याचा निर्णय घेत व्यवसाय सुरू केला. काही दिवस त्यांनी गावोगावी जाऊन भाजीपाला विकला. आता अनलॉकनंतर भाजी मंडई पुन्हा सुरू झाल्याने भाजीपाला विक्रीतून पुरेसा नफा मिळेनासा झाला.
पुन्हा बेरोजगार झाल्यानंतर ज्ञानेश्वरच्या शेतात असलेल्या केळीपासून चिप्स तयार करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यासाठी त्यांनी औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागात जागा शोधली. त्यांची परिस्थिती पाहून जागा मालकाने देखील त्यांना जागा दिली. त्यांनी तातडीने सामानाची जुळवाजुळव करत चिप्स विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या व्यवसायाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना कधी आटोक्यात येईल आणि पुन्हा कधी सर्व रोजगार सुरळीत होतील हे माहीत नाही. शाळा सुरू झाल्यानंतरही शिक्षकांना लगेच नियमित वेतन मिळेल का? हाही प्रश्न आहे. अशा परिस्थितीत खचून न जाता या दोन शिक्षकांनी रोजगाराचा शोधलेला मार्ग नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.