औरंगाबाद - उत्सुकतेपोटी फिरण्यासाठी गेलेल्या 2 युवकांचा लेणी मधील कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी कन्नड तालुक्यातील पितळखोरा लेणी येथे घडली. या 2 युवकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
औरंगाबादेत दोन तरुणाचा कुंडात बुडून मृत्यू - पितळखोरा
औरंगाबाद येथून पितळखोरा लेणी बघण्याकरिता गेलेल्या दोन तरुणाचा पिरळखोरा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली
कन्नड तालुक्यातील आंबातांडा येथील योगेश विलास भोंगळे आणि मुंडवाडी येथील शरद रामचंद्र साळुंखे हे दोघे आते मामे भाऊ होते. हे दोघेही औरंगाबाद येथून पितळखोरा लेणी बघण्यासाठी गेले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघेही पितळखोरा येथील पाण्याच्या कुंडाकडे गेले होते. कुंड बघत असतांना दोघेही अचानक कुंडातील पाण्यात पडल्याचे एका पर्यटक महिलेने बघितले.
महिलेने तत्काळ या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना सांगितली. स्थानिकांनी या घटनेची माहिती कन्नड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुंडात शोधकार्य सुरू केले. दोन तासानंतर दोघांचा शोध लागला, दोघांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना मृत घोषित केले.