औरंगाबाद - शहरात कुत्र्याच्या गळ्याला साखळी बांधून दुचाकीच्या मागे फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कुत्र्याला अमानुष वागणूक देण्याऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांमध्ये एकजण अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
दोन जण, एका दुचाकीवर कुत्र्याला फरफटत घेऊन जातानाचा एक व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारावरून श्वानप्रेमींनी क्रांतिचौक पोलिसात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार पुष्कर शिंदे यांनी दाखल केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी गांधीनगर येथे राहणाऱ्या चिराग बिडला या युवकासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
ते दोघे खोकडपुरा, शिवाजी हायस्कुल परिसर, अजबनगर या भागातून एका कुत्र्याला दुचाकीवर ओढून नेत होते. तेव्हा एका व्यक्तीने कारमधून त्यांचा व्हिडिओ काढला. अवघ्या 14 सेकंदाच्या व्हिडिओत या घटनेची क्रूरता दिसून येते. दुचाकीवर दोन जण वेगात जात आहेत. पाठीमागे बसलेल्या इसमाचा हातात साखळी असून त्या साखळीच्या माध्यमातून एका कुत्र्याला रस्त्यावरून फरफटत ओढत नेले जात आहे. कुत्रा त्रास होत असल्याने ओरडत आहे. मात्र, दुचाकीवरील व्यक्ती निर्दयीपणे गाडी पळवत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. या व्हिडिओत कुत्र्याला दिलेला त्रास पाहून श्वानप्रेमींनी संताप व्यक्त केला.